आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या मारुती आहेर यांचा वयाच्या साठीत समस्त शहरवासी मंडळींच्या वतीने जंगी नागरी सत्कार करण्याचे ठरले. हा सत्कार त्यांच्या एकसष्टीनिमित्त नव्हता किंवा अविवाहित राहिले म्हणूनही नव्हता. तर त्याचे एक खास कारण होते. मारुतीरायांच्या शर्टाच्या खिशात कायम दोन-तीन आहेराची पाकिटे असत. लग्न कुणाचेही, कुठेही, कधीही असो, मारुतीराव वधू-वरांना आशीर्वाद द्यायला जातीने हजर असत आणि न चुकता आहेर करत. स्वतः अविवाहित असूनही सर्वाधिक नवपरिणित जोडप्यांना आहेर करण्याचा विक्रमच जणू त्यांनी केला होता. ठरल्याप्रमाणे महापौरांच्या हस्ते त्यांचा जंगी सत्कार झाला.
सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ''बंधू-भगिनींनो, मी जे काही काही केले त्यामागचे कारण आज सांगतो. मी एकटा, अविवाहित, कर्मदरिद्री! माझे उत्पन्नही तुटपुंजे. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. मग त्यावर मी एक उपाय शोधून काढला...''
आणि त्यांनी खिशातून आहेराचे पाकीट काढून उंचावले.
''अहो, फक्त अकरा रुपयांत मला रोज एवढे सुग्रास भोजन कोणत्या हॉटेलात मिळाले असते बरे...!''
Thursday, December 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment