Wednesday, December 31, 2008
कसलं नवं वर्ष...
सुखलाल - मग दुखीराम, नव्या वर्षाचं स्वागत तू कसं करणार?
दुखीराम - कसलं नवं वर्ष... अन् कसलं आलंय स्वागत...
सुखलाल - का रे, सारे जग एवढं उत्साहात असताना तू निराश का?
दुखीराम - आता हेच बघ, आपण दोघे जुने मित्र. या जुन्याच हॉटेलात बसून आपण जुनीच 'ओल्ड मंक' रम पीत आहोत. रात्री पुन्हा आपण आपल्या जुन्याच घरी गेल्यावर जुनीच बायको 'आज पण ढोसून आलात ना!' हे जुनेच वाक्य आपल्या तोंडावर फेकून जुन्याच पद्धतीने नववर्षात आपलं स्वागत करणार. सकाळी जुन्याच ब्रशनं दात घासून जुन्याच बंबातल्या पाण्यानं मी आंघोळ करणार. मग कळकटलेल्या त्याच जुन्या कपातला चहा मी पिणार. त्यानंतर इस्त्री केलेले जुनेच कपडे परिधान करून जुन्याच स्कूटरने मी जुन्याच ऑफिसात कामावर जाणार आणि तेच ते जुने सहकारी 'हॅपी न्यू इयर' म्हणून मला औपचारिक शुभेच्छा देणार... यात कसलं आलंय नावीन्य?
Tuesday, December 30, 2008
मूर्ख आणि महामूर्ख
''का रे?''
''म्हणतात ना- शहाण्या माणसाने पोलिस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये.''
''मग...''
''मी पोलिस निरीक्षक असल्याने नाइलाजाने रोजच मला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागते.''
''अरे, मग मी तर महामूर्खच आहे.''
''तो कसा काय?''
''अरे मी वकील आहे... आणि तोही साध्या कोर्टातला नव्हे, तर हायकोर्टातला!''
Sunday, December 28, 2008
कॉल... तेव्हा आणि आता
''सायलीचा.''
''अरे! तिच्याशी प्रेमविवाह करूनही सहा महिन्यात तू एवढा बदललास! तेव्हा तू तिने मिस कॉल देताच स्वतः फोन करून तासन् तास हळू आवाजात गप्पा मारायचास. आणि आता तिचा मिस कॉल आला की चक्क मोबाईल बंद!''
''काय करणार... तेव्हा तो हवाहवासा 'मिस' कॉल असायचा...''
''आणि आता?''
''...आता तो नकोसा 'मिसेस' कॉल असतो.
Wednesday, December 24, 2008
द ग्रेट ऑफर!
ख्रिसमसनिमित्त खास आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी...
एक किलो मिठाईबरोबर एक ग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत!
(त्वरा करा... ऑफर फक्त साठा असेपर्यंतच)'
दुकानाबाहेरची पाटी वाचून नानासाहेब लगबगीने दुकानात शिरले आणि थाटात पाच किलो मिठाईची ऑर्डर दिली.
दुकानदाराने पाच किलो मिठाई वजन करून दिली आणि एका छानशा गुलाबी डबीतले पाच ग्रॅम सोन्याचे नाणे नानासाहेबांच्या हातावर ठेवले. नानासाहेबांनी ती डबी काळजीपूर्वक आपल्या कोटाच्या खिशात ठेवली आणि विचारले,
''किती बिल झाले?''
''दहा हजार!''
''काय? दहा हजार!... मिठाई कशी किलो आहे?''
''दोन हजार रुपये किलो... खास ख्रिसमसनिमित्तची.. खास मिठाई... आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी!''
Tuesday, December 23, 2008
भिकारी... भांडवलदार!
''भिकारी... आणि भांडवलदार?''
''हो, तो त्याच्या कटोऱ्यात मुद्दाम कोऱ्या करकरीत नोटा स्वतःच ठेवतो त्यामुळे भीक टाकणाराही नोटाच टाकतो. आणि आपण कर्मदरिद्री!''
''कसे काय?''
''आपल्याकडे कटोऱ्यात ठेवायला साधे एक नाणेही असत नाही.
त्यामुळे आपल्याला भीकही मिळत नाही. भांडवलाशिवाय कुठलाच धंदा करता येत नाही, हेच खरे!''
Sunday, December 21, 2008
मंदी आणि तेजी
''...पण तुला सांगतो, जगात कितीही मंदी आली, तरी आपला धंदा मात्र तेजीतच चालणार.''
''तो कसा काय?''
''हे बघ, जसजशी मंदी वाढेल, तसतशा लोकांच्या समस्या वाढतील.''
''त्याने काय होईल?''
''अरे, एकदा का समस्या हाताबाहेर जाऊ लागल्या की हताश होऊन लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येणार. देवाबरोबरच आपल्यासारख्या दीनदुबळ्यांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून आपल्याला मोठ्या मनाने दान करणार आणि आपल्या धंद्याला बरकत येणार!''
Saturday, December 20, 2008
आई गं!
तर कधी प्रियाबरोबर सिनेमाला असे त्याचे कॉलेजचे दिवस
मजेत चालले होते. पण सीमा कधीही त्याला भेटली की ती फक्त
त्याच्या शेजारी तासन् तास बसून राही आणि एकच हट्ट धरी- ''मला तुझ्या आईला भेटायचंय.''
शेवटी एक दिवस रमेश वैतागून म्हणाला, ''माझे आई! भेटवतो,
पण कशासाठी भेटायचं, ते तर सांगशील.''
''मला त्यांचा आशीर्वाद हवाय..''
''कशासाठी?''
सीमा लाजून म्हणाली, ''कारण मला तुझ्या मुलाची आई
व्हायचंय.... अर्थात लग्न करून!''
''आई गं!''
Friday, December 19, 2008
आज... जयंती!
''कशाबद्दल?'' आईने विचारले.
''अगं आज शाळा सुरू झाली त्याचा साप्ताहिक वधार्पनदिन आहे.''
दोन दिवसांनी शाळा बुडविण्यासाठीचे त्याचे कारण होते- आज आमच्या माजी मुख्याध्यापकांचा प्रथम स्मृतिदिन आहे.
अशी कारणे सांगता सांगता त्याचा वाढदिवस आला. नेहमीच्या सवयीने रामू आईला म्हणाला, ''आई आज मी शाळेत जाणार नाही.''
''का रे?'' आई म्हणाली.
''अगं, आज माझी जयंती आहे.''
Sunday, December 14, 2008
बाकरवडीची चव...
'एक घोट- एक बाकरवडी' असा त्याचा दोन कलमी कार्यक्रम शेजारी बसलेल्या एका चिकित्सक पुणेकराच्या लक्षात आला.
त्याने सदाला विचारले, ''का हो, एक विचारू?''
''विचारा की!''
''नाही म्हणजे मलाही बाकरवडी आवडते, पण मी आधी बाकरवड्या खातो आणि मग एकदाच पाणी पितो. पण मी मघापासून बघतोय की तुम्ही आधी पाणी पिताय आणि मग एक बाकरवडी खाताय, असे का?''
'पाण्याचा' एक दीर्घ घोट घेत सदा म्हणाला, ''अहो, त्याशिवाय बाकरवडीची अस्सल चव कळत नाही!''
Saturday, December 13, 2008
ऑनलाइन...
''तुला सांगते, आमची पहिली ओळख ऑनलाइनच झाली.''
''ती कशी काय?''
''अगं असंच एकदा नेटवर चॅटिंग करताना 'हा' मला भेटला.''
''हो का!''
''मग वरचेवर नेटवर भेटी वाढतच गेल्या.''
''नंतर...''
''शेवटी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.''
''लग्न अगदी थाटात झाले असेल नाही!''
''हो ना, अगदी वैशिष्ट्यपूर्ण...''
''कुठं झालं लग्न भारतात, की अमेरिकेत?''
''अग ऑनलाइनच केलं. त्यानं अमेरिकत त्याच्या मॉनिटरला हार घातला आणि मी भारतात माझ्या मॉनिटरला. ''
'' अय्या!''
''गंमत म्हणजे सत्यनारायणाची पूजादेखील ऑनलाइनच केली.''
''अग्गो बाई...! मग हनीमूनला कुठे गेलात?... नक्कीच स्वित्झर्लंडला गेला असाल!''
''नाही गं...''
''इश्श, म्हणजे हनीमूनदेखील ऑनलाइनच...!''
Friday, December 12, 2008
आलोच...
केशवने विचारले, ''काय रे माधवा, आज कसं काय गंडवलस बायकोला?''
''काही नाही यार, तिला शॉपिंगसाठी शेजारच्या साड्यांच्या मॉलमध्ये सोडले नि दोन मिनिटांत आलोच म्हणून सटकलो. आता किमान दोन-अडीच तास तरी तिला माझी आठवण देखील येणार नाही. तोपर्यंत उथलं उरकून जातोच बिल द्यायला...!''
Thursday, December 11, 2008
आहेराचे रहस्य
सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ''बंधू-भगिनींनो, मी जे काही काही केले त्यामागचे कारण आज सांगतो. मी एकटा, अविवाहित, कर्मदरिद्री! माझे उत्पन्नही तुटपुंजे. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. मग त्यावर मी एक उपाय शोधून काढला...''
आणि त्यांनी खिशातून आहेराचे पाकीट काढून उंचावले.
''अहो, फक्त अकरा रुपयांत मला रोज एवढे सुग्रास भोजन कोणत्या हॉटेलात मिळाले असते बरे...!''
Wednesday, December 10, 2008
कुणीही सांगेल...!
एवढं बोलून नानांनी फोन ठेवला आणि पाहुण्यांची वाट पाहू लागले. दुपार उलटली... संध्याकाळ झाली तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजले आणि फोन खणाणला. फोनवर पाहुणेच बोलत होते-
''तुम्ही सांगितलं तिथं येऊन दुपारपासून प्रत्येकाला विचारतोय हो, पण कुणालाही तुमचं घर माहीत नाहीए हो...''
''बरं बरं, असू दे... आत्ता तुम्ही कुठे उभे आहात तेवढं सांगा...''
''संपर्क एसटीडी बूथ.''
''अगदी बरोब्बर आलात बघा. त्या एसटीडी बूथची पाटी आहे ना, त्याच्या वरची खिडकी आमचीच. शेजारच्या जिन्यानं सरळ वर या... पहिल्या मजल्यावरचं पहिलंच घर... कुणीही सांगेल...!''
Tuesday, December 9, 2008
त्याग
डॉक्टर सदाला म्हणाले, ''हे बघ सदा, तुला जर दीर्घायुषी व्हायचे असेल, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल.''
त्यावर सदा म्हणाला, ''डॉक्टर तो तर मी करतोच आहे. मधुमेह व्हायला नको म्हणून एक वर्षापासून मी चहा सोडलाय.''
''अरे वा!''
''आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर, वजन वाढायला नको म्हणून मी भातदेखील अजिबात खात नाही.''
''शाबास!''
''शिवाय रक्तदाब नियंत्रणात राहावा, म्हणून मी बायकोला सांगूनच ठेवलंय की जेवणात मीठ कमी टाक म्हणून.''
''अरे, तू तर बराच त्याग करतोयस की...''
''एवढंच नाही डॉक्टर, अल्सर, मूळव्याधाचा धोका नको म्हणून तेलकट, तिखट तर मी टाळतोच...''
''ते सर्व ठीक आहे रे, पण त्यापेक्षाही सगळ्यात आधी तुला दारू सोडावी लागेल!''
''तेवढं सोडून बोला डॉक्टर, दारूशिवाय मी जगूच शकणार नाही...''
''सॉरी सदा, दारू सोडली नाहीस, तर तुला आणखी एक गोष्ट लागेल...''
''कोणती?''
''हे जग!''
Monday, December 8, 2008
आज नको... उद्या!
विलासराव लहानपणापासूनच आळशी स्वभावाचे. आई-वडिलानी कुठलेही काम सांगितले, की लहानगा विलास म्हणायचा, "आता नको, थोड्या वेळाने करतो.'' असा हा विलास मोठा होऊन विलासराव झाला तशा त्याच्या काम टाळण्याच्या सबबी बदलत गेल्या. कुणी काहीही सांगितले, की विलासराव म्हणत, "आता नको, आज मी जरा बिझी आहे.. आपण उद्या काय ते पाहू.'' आणि त्यांचा उद्या काही येत नसे आणि भिजतघोंगडे तसेच राही. आराम करून करून यथावकाश विलासरावांचा देह विशाल झाला, वयही वाढले आणि एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दवाखान्यात डॉक्टर त्यांच्यासंमोरच त्यांच्या मुलाला सांगत होते, "हे पॉवरफुल इंजेक्शन आजच़; खरं तर आत्ताच यांना द्यावे लागेल, नाहीतर... ''
त्यावर विलासराव तत्काळ म्हणाले, "नको, नको, आत्ता नको. आज मी जरा बिझी आहे... उद्या बघू!''
Sunday, December 7, 2008
गिफ्ट पॅक
गोविंदराव खरेदीला गेले की कुठलीही वस्तू असो, ती पाहून झाली की ते विक्रेत्याकडे आग्रह धरीत- मला पॅक पीस हवाय! एके दिवशी गोविंदराव दुपारी एकटेच घरी असताना दारावरची बेल वाजली. गोविंदरावांनी दरवाजा उघडला. दारात हसतमुख चेहऱ्याने एक रुबाबदार तरुण उभा. गोविंदरावांनी काही विचारायच्या आतच त्याने पोपटपंची सुरू केली- "सर, आमच्या डायमंड वॉचेसतर्फे फक्त आजच्या दिवस तुमच्यासारख्या काही खास लोकांसाठी एक स्पेशल स्कीम- एका लेडीज वॉचवर पुरुषांसाठी एक घड्याळ फ्री... आणि तेही सवलतीच्या दरात!'' आणि त्याने लगेच दोन चकचकणारी घड्याळे गोविंदरावांच्या हातावर ठेवली.
नेहमीप्रमाणे गोविंदरावांनी घड्याळे नीट निरखून पाहिली आणि विचारले, "केवढ्याला?''
"तशी एमआरपी दोन हजार रुपये आहे, पण आज आम्ही ती दोन्ही देत आहोत फक्त हजार रुपयांत!''
"ठीक आहे, पण मला पॅक पीस हवाय!''
"यस सर, पॅक पीसच देतो आणि खास तुमच्यासाठी कंपनीने केलेला गिफ्ट पॅकच देतो. वहिनी आल्या की थेट त्यांच्या हातीच द्या गिफ्ट पॅक फोडायला, बघा त्या किती खूष होतील तुमच्यावर!''
केवळ कल्पनेनेच गोविंदराव आनंदले आणि घाईघाईने त्यांनी पाचशेच्या दोन नोटा देऊन तो गिफ्ट पॅक ताब्यात घेतला. संध्याकाळी मोठ्या थाटात त्यांनी तो गिफ्ट पॅक पत्नीला दिला. मालतीबाईंनीही अलगद कागद उलगडून गिफ्ट पॅक उघडला. आत दोन घड्याळे होती. हुबेहुब विक्रेत्याने दाखवली तशीच... पण खेळण्यातली!
Saturday, December 6, 2008
पुढे-पुढे...मागे-मागे
''काय गं मुक्ता, राजू की संजू? कोणाची निवड करणारेस?''
''कोणाचीच नाही!''
''का गं, बिच्चारा राजू तर तुझ्या कित्ती पुढे-पुढे करीत असतो.''
''म्हणूनच, असा पुढे-पुढे करून थुंकी झेलणारा शेळपट जोडीदार मला नकोय!''
''आणि संजू? तो तर तुझ्या कित्ती मागे लागलाय, तू जिथे जातेस तिथं असतो.''
''...असा सतत मागे-मागे राहून गोंडा घोळणारा वेडपट तर अजिबात नको!''
Friday, December 5, 2008
कटुसत्य
''आणि ती?''
''तीही माझ्याकडे पाहायची...''
''काय सांगतोस!''
''...तसा मला भास व्हायचा.''
''अच्छा!''
''ती मला खूप आवडायची.''
''आणि तिला?''
''तिलाही मी खूप आवडायचो...''
''खरंच!''
''हो, असं मला वाटायचं.''
''मग प्रॉब्लेम काय झाला यार?''
''माझं तिच्यावर नितांत प्रेम होतं, हे त्रिकालाबाधित सत्य होतं...''
''मग?''
''पण... एक कटुसत्यही होतं.''
''काय?''
''मी तिला अजिबात आवडत नव्हतो आणि तिचं माझ्यावर तसूभरही प्रेम नव्हतं!''
''अरेरे....!''
Thursday, December 4, 2008
दुःख
''तुला सांगतो, कॉलेजात असताना माझी काय वट होती. कॉलेजच्या गेटवर जरी माझं नाव सांगितलं तरी कुणीही माझ्यापर्यंत येऊन पोचत असे.''
''मग तुला खूप मुली ओळखत असतील नाही!''
''अरे, मुली तर माझी ओळख करून घेण्यासाठी ध़डपडायच्या...''
''काय सांगतोस'?''
''खरंच सांगतोय यार...''
''पण एवढ्या मुलींशी ओळखी असूनही वयाची चाळिशी तू ओलांडलीस तरी अजून तुझं लग्न कसं झालं नाही?"
''तेच तर दुःख आहे यार, कॉलेजात दर रक्षाबंधनाला माझे दोन्ही हात राख्या बांधायला पुरायचे नाहीत, पण फ्रेंडशिप डेला तेच माझे दोन्ही हात चक्क ओस पडायचे रे....!''
Wednesday, December 3, 2008
मुका.. बहिरा...
दुसरा - काय?
पहिला - जर का मला पुढचा जन्म मिळाला...
दुसरा - तर?
पहिला - तर लग्न करण्यापूर्वी मी किमान दहादा विचार करीन...
दुसरा - आणि...
पहिला - आणि किमान शंभर मुली पाहीन.... आणि मुक्या मुलीशीच लग्न करीन.
दुसरा - अरे पण का?
पहिला - कारण, या जन्मातली माझी बायको एवढी बोलते.. एवढी बोलते... एवढी बोलते...
की मी पार मुका होऊन जातो आणि मला असं वाटतं, की मी बहिरा असतो तर किती बरं झालं असतं!
Tuesday, December 2, 2008
दुःखी मन मेरे...
मित्र म्हणाला, ''समोरच्या डायनिंग हॉलचं नाव काय आहे म्हणालास?''
''आनंदी डायनिंग हॉल.'' उडपी उत्तरला.
''अरे मग तू बार सुरू कर - दुःखी रेस्टॉरंट अँड बिअर बार!''
Sunday, November 30, 2008
रक्तदान
''यार मध्या, मला कधी कधी वाटतं ना की समाजासाठी काही तरी केले पाहिजे यार.'' सदा म्हणाला.
''मग करू की'' - मध्या म्हणाला.
''पण काय करणार यार?''
''अरे, उद्या गांधी पुण्यतिथीनिमित्त आपल्या कॉलनीत रक्तदान शिबिर आहे, तिथंच रक्तदान करू.''
''अरे ते तर आपण मागच्या वर्षी पण केलं होतं!''
''हो, मग या वर्षी पण करू, तेवढंच पुण्य गाठीला.''
दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात संयोजक आला व म्हणाला, ''सॉरी, तुम्हा दोघांना रक्तदान करता येणार नाही.''
''का?'' दोघेही एकसुरात म्हणाले.
''कारण मागच्या वर्षी तुम्ही दोघांनीही दिलेल्या रक्तात रक्तघटकांऐवजी फक्त अल्कोहोलच निघालं!''
Friday, November 28, 2008
आवाज
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की...
त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो-
फाट.... फाट...
Tuesday, November 25, 2008
काय करणार...
बडीशेप आणायला गेलेला सदा तासाभराने आला तो झिंगतच.
''का हो?'' बायकोने विचारले.
''काय करणार, वेटर म्हणाला की फक्त बडीशेप देता येणार नाही. कमीत कमी एक पेग तरी घ्या म्हणजे बिलाबरोबर बडीशेप देतो. मग काय....''
सदाच्या बायकोने कपाळाला हात लावला.
Sunday, November 23, 2008
कित्ती छान...!
नवरा - वा! छानच... सुंदर!
बायको - बघा ना, काळा रंगसुद्धा किती गोड दिसतो नाही.
नवरा - ऑ, काळा रंग?
बायको - हो!
नवरा - अगं, एवढ्या गोऱ्यापान, देखण्या स्त्रीला तू काळी म्हणतेस?
बायको - अहो, मी तिच्याबद्दल नाही, तिच्या साडीविषयी बोलतेय.
नवरा - अरेरे, आणि मी त्या ललनेबद्दल....!
बायको - रोखून काय पाहताय, चला...
Saturday, November 22, 2008
हास्यक्लब!
आशिया खंडातले हे सर्वांत मोठे वेड्यांचे हॉस्पिटल आहे.
पर्यटक - अरेच्चा!... कमाल आहे! हे कसं शक्य आहे?
गाईड - का हो?
पर्यटक - अहो, मागच्या ट्रिपला मी इथे आलो, तेव्हा तर इथे पाटी होती...
गाईड - कोणती?
पर्यटक - 'हा-हा-ही हास्यक्लब'.... !
Tuesday, November 18, 2008
जोड्या लावा....
त्यावर विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, ''घरखर्चाच्या गणिताचं काय घेऊन बसलात सर, अहो 'जोड्या लावा' या प्रश्नात माझा हातखंडा, पण माझ्या आयुष्यात मात्र मला स्वतःची योग्य जोडी नाही लावता आली हो...''
Sunday, November 16, 2008
हलके हलके
प्रेयसी - हो ना रे राज्जा! अगदी गॅसच्या फुग्यांप्रमाणे....
प्रियकर - असं वाटतं, की असंच प्रेमाच्या आकाशात वर वर जाऊन स्वर्गसुखाचा आस्वाद घ्यावा.
प्रेयसी - हो ना!... पण लग्न झाल्यानंतर हा प्रेमाचा गॅस संपला तर...
प्रियकर - लग्न झाल्यानंतर तू फक्त स्वयंपाकाची चिंता कर, गॅसचं मी पाहून घेईन!
Saturday, November 15, 2008
काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
Friday, November 14, 2008
फारच छान!!
प्रियकर - सर्व काही आहे राणी!
प्रेयसी - म्हणजे नेमकं काय काय आहे?
प्रियकर - अगं फोर व्हिलर, टू व्हिलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन...
प्रेयसी - अजून?
प्रियकर - होम थिएटर, ओव्हन, कुलर...
प्रेयसी - आणखी काही?
प्रियकर - फूड प्रोसेसर, गॅस गिझर...
प्रेयसी - छान! पण तुझ्या घरी कोण कोण असतं रे?
प्रियकर - मला कुणीच नाही. आई होती, तीही सहा महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली. पण तिची आठवण म्हणून तिचे दागिने मी कपाटात जपून ठेवले आहेत.
प्रेयसी - वा! फारच छान!!
Thursday, November 13, 2008
काय करशील?
प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!
प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?
प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर मी ते चेपून देईल!
प्रियकर - डोकं दुखलं तर...
प्रेयसी - दाबून देईल!
प्रियकर - पण समजा, दिवसभर तुझ्याशी भांडून भांडून माझा घसा दुखला तर....?
प्रेयसी - तर मी तुझा गळा दाबीन!!!
Friday, August 29, 2008
प्रेम कुणावरही करू नये!
मस्तीत जगावं
हॉटेलात जावं..
खावं - प्यावं...
पोरींचं बिल उगाच भरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!
प्रेम म्हणजे
एक अजब गेम असते
जिच्यासाठी आपण
धडपडतो...
तडफडतो
ती चक्क
दुसऱ्याची डेम असते
सत्य ध्यानी आल्यावर
फुक्कटचं झुरू नये;
प्रेम कुणावर करू नये!
म्हणे-
प्रेम म्हणजे
एक पवित्र नातं असतं!
अहो, कसचं काय!
प्रेम म्हणजे
एक विचित्र जातं असतं...
दळणारं आंधळं
दळदळ दळत असतं
आणि पीठ मात्र
भलतचं कुत्र खात असतं!
आपण दळलेल्या पिठावर
ऐऱ्यागैऱ्याने चरू नये;
म्हणून आपणच
प्रेम कुणावर करू नये!
चेहऱ्यावरचं चांदणं तिच्या
कितीही दुधाळ असलं,
गुलुगुलू बोलणं तिचं
कितीही मधाळ असलं,
तरी...
शहाण्यानं मधमाशी
हातात धरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!

