Wednesday, December 31, 2008

कसलं नवं वर्ष...

एकतीस डिसेंबरच्या त्या रम्य सायंकाळी सुखलाल आणि दुखीराम हे दोन मित्र हॉटेलात मद्याचे प्याले रिचवत बसले होते.
सुखलाल - मग दुखीराम, नव्या वर्षाचं स्वागत तू कसं करणार?
दुखीराम - कसलं नवं वर्ष... अन् कसलं आलंय स्वागत...
सुखलाल - का रे, सारे जग एवढं उत्साहात असताना तू निराश का?
दुखीराम - आता हेच बघ, आपण दोघे जुने मित्र. या जुन्याच हॉटेलात बसून आपण जुनीच 'ओल्ड मंक' रम पीत आहोत. रात्री पुन्हा आपण आपल्या जुन्याच घरी गेल्यावर जुनीच बायको 'आज पण ढोसून आलात ना!' हे जुनेच वाक्य आपल्या तोंडावर फेकून जुन्याच पद्धतीने नववर्षात आपलं स्वागत करणार. सकाळी जुन्याच ब्रशनं दात घासून जुन्याच बंबातल्या पाण्यानं मी आंघोळ करणार. मग कळकटलेल्या त्याच जुन्या कपातला चहा मी पिणार. त्यानंतर इस्त्री केलेले जुनेच कपडे परिधान करून जुन्याच स्कूटरने मी जुन्याच ऑफिसात कामावर जाणार आणि तेच ते जुने सहकारी 'हॅपी न्यू इयर' म्हणून मला औपचारिक शुभेच्छा देणार... यात कसलं आलंय नावीन्य?

Tuesday, December 30, 2008

मूर्ख आणि महामूर्ख

''कधी कधी वाटतं, मी मूर्ख आहे!''
''का रे?''
''म्हणतात ना- शहाण्या माणसाने पोलिस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये.''
''मग...''
''मी पोलिस निरीक्षक असल्याने नाइलाजाने रोजच मला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागते.''
''अरे, मग मी तर महामूर्खच आहे.''
''तो कसा काय?''
''अरे मी वकील आहे... आणि तोही साध्या कोर्टातला नव्हे, तर हायकोर्टातला!''

Sunday, December 28, 2008

कॉल... तेव्हा आणि आता

समीरच्या मोबाईलवर मिस कॉल येताच त्याने तातडीने मोबाईल स्वीच ऑफ केला. तेव्हा सचिनने विचारले, ''काय रे, कुणाचा मिस कॉल होता?''
''सायलीचा.''
''अरे! तिच्याशी प्रेमविवाह करूनही सहा महिन्यात तू एवढा बदललास! तेव्हा तू तिने मिस कॉल देताच स्वतः फोन करून तासन् तास हळू आवाजात गप्पा मारायचास. आणि आता तिचा मिस कॉल आला की चक्क मोबाईल बंद!''
''काय करणार... तेव्हा तो हवाहवासा 'मिस' कॉल असायचा...''
''आणि आता?''
''...आता तो नकोसा 'मिसेस' कॉल असतो.

Wednesday, December 24, 2008

द ग्रेट ऑफर!

'द ग्रेट ऑफर-
ख्रिसमसनिमित्त खास आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी...
एक किलो मिठाईबरोबर एक ग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत!
(त्वरा करा... ऑफर फक्त साठा असेपर्यंतच)'
दुकानाबाहेरची पाटी वाचून नानासाहेब लगबगीने दुकानात शिरले आणि थाटात पाच किलो मिठाईची ऑर्डर दिली.
दुकानदाराने पाच किलो मिठाई वजन करून दिली आणि एका छानशा गुलाबी डबीतले पाच ग्रॅम सोन्याचे नाणे नानासाहेबांच्या हातावर ठेवले. नानासाहेबांनी ती डबी काळजीपूर्वक आपल्या कोटाच्या खिशात ठेवली आणि विचारले,
''किती बिल झाले?''
''दहा हजार!''
''काय? दहा हजार!... मिठाई कशी किलो आहे?''
''दोन हजार रुपये किलो... खास ख्रिसमसनिमित्तची.. खास मिठाई... आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी!''

Tuesday, December 23, 2008

भिकारी... भांडवलदार!

साम्यवादी विचारसरणीच्या देशातील एका मोठ्या शहरात फुटपाथवरील एक भिकारी शेजारच्या भिकाऱ्याला म्हणतो, ''तो समोरच्या फुटपाथवरचा भिकारी पक्का भांडवलदार आहे.''
''भिकारी... आणि भांडवलदार?''
''हो, तो त्याच्या कटोऱ्यात मुद्दाम कोऱ्या करकरीत नोटा स्वतःच ठेवतो त्यामुळे भीक टाकणाराही नोटाच टाकतो. आणि आपण कर्मदरिद्री!''
''कसे काय?''
''आपल्याकडे कटोऱ्यात ठेवायला साधे एक नाणेही असत नाही.
त्यामुळे आपल्याला भीकही मिळत नाही. भांडवलाशिवाय कुठलाच धंदा करता येत नाही, हेच खरे!''

Sunday, December 21, 2008

मंदी आणि तेजी

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराशेजारील फुटपाथवर दोन भिकाऱ्यांची 'जागतिक मंदी' या विषयावर चर्चा सुरू होती.
''...पण तुला सांगतो, जगात कितीही मंदी आली, तरी आपला धंदा मात्र तेजीतच चालणार.''
''तो कसा काय?''
''हे बघ, जसजशी मंदी वाढेल, तसतशा लोकांच्या समस्या वाढतील.''
''त्याने काय होईल?''
''अरे, एकदा का समस्या हाताबाहेर जाऊ लागल्या की हताश होऊन लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येणार. देवाबरोबरच आपल्यासारख्या दीनदुबळ्यांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून आपल्याला मोठ्या मनाने दान करणार आणि आपल्या धंद्याला बरकत येणार!''

Saturday, December 20, 2008

आई गं!

रमेशला डझनभर खास मैत्रिणी होत्या. कधी रीनाबरोबर बागेत,
तर कधी प्रियाबरोबर सिनेमाला असे त्याचे कॉलेजचे दिवस
मजेत चालले होते. पण सीमा कधीही त्याला भेटली की ती फक्त
त्याच्या शेजारी तासन् तास बसून राही आणि एकच हट्ट धरी- ''मला तुझ्या आईला भेटायचंय.''
शेवटी एक दिवस रमेश वैतागून म्हणाला, ''माझे आई! भेटवतो,
पण कशासाठी भेटायचं, ते तर सांगशील.''
''मला त्यांचा आशीर्वाद हवाय..''
''कशासाठी?''
सीमा लाजून म्हणाली, ''कारण मला तुझ्या मुलाची आई
व्हायचंय.... अर्थात लग्न करून!''
''आई गं!''