Sunday, November 30, 2008

रक्तदान

दारूच्या दोन बाटल्या आडव्या झाल्यावर सदा आणि मध्या चांगलेच रंगात आले.
''यार मध्या, मला कधी कधी वाटतं ना की समाजासाठी काही तरी केले पाहिजे यार.'' सदा म्हणाला.
''मग करू की'' - मध्या म्हणाला.
''पण काय करणार यार?''
''अरे, उद्या गांधी पुण्यतिथीनिमित्त आपल्या कॉलनीत रक्तदान शिबिर आहे, तिथंच रक्तदान करू.''
''अरे ते तर आपण मागच्या वर्षी पण केलं होतं!''
''हो, मग या वर्षी पण करू, तेवढंच पुण्य गाठीला.''
दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी रांगेत उभे होते. तेवढ्यात संयोजक आला व म्हणाला, ''सॉरी, तुम्हा दोघांना रक्तदान करता येणार नाही.''
''का?'' दोघेही एकसुरात म्हणाले.
''कारण मागच्या वर्षी तुम्ही दोघांनीही दिलेल्या रक्तात रक्तघटकांऐवजी फक्त अल्कोहोलच निघालं!''

Friday, November 28, 2008

आवाज

रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की...
त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो-
फाट.... फाट...

Tuesday, November 25, 2008

काय करणार...

दारू ढोसल्याशिवाय सदाचा एक दिवसही पार पडत नव्हता. त्या दिवशी मात्र कमालच झाली. घरी पाहुणे आल्याने दिवसभर त्याने संयम पाळला. रात्रीची जेवणे झाली. पाहुणे गेले. दाऱूचा एकही पेग न घेता आपला नवरा आज जेवला हे पाहून सदाच्या बायकोलाही समाधान वाटले. त्याच आनंदात ती म्हणाली, ''अहो जा, थोडी बडीशेप तरी तोंडात टाका.''
बडीशेप आणायला गेलेला सदा तासाभराने आला तो झिंगतच.
''का हो?'' बायकोने विचारले.
''काय करणार, वेटर म्हणाला की फक्त बडीशेप देता येणार नाही. कमीत कमी एक पेग तरी घ्या म्हणजे बिलाबरोबर बडीशेप देतो. मग काय....''
सदाच्या बायकोने कपाळाला हात लावला.

Sunday, November 23, 2008

कित्ती छान...!

बायको - अय्या, पाहा ना, कित्ती छान आहे नाही...
नवरा - वा! छानच... सुंदर!
बायको - बघा ना, काळा रंगसुद्धा किती गोड दिसतो नाही.
नवरा - ऑ, काळा रंग?
बायको - हो!
नवरा - अगं, एवढ्या गोऱ्यापान, देखण्या स्त्रीला तू काळी म्हणतेस?
बायको - अहो, मी तिच्याबद्दल नाही, तिच्या साडीविषयी बोलतेय.
नवरा - अरेरे, आणि मी त्या ललनेबद्दल....!
बायको - रोखून काय पाहताय, चला...

Saturday, November 22, 2008

हास्यक्लब!

गाईड - ती पाटी पाहा - 'वेड्यांचे हास्पिटल'.
आशिया खंडातले हे सर्वांत मोठे वेड्यांचे हॉस्पिटल आहे.
पर्यटक - अरेच्चा!... कमाल आहे! हे कसं शक्य आहे?
गाईड - का हो?
पर्यटक - अहो, मागच्या ट्रिपला मी इथे आलो, तेव्हा तर इथे पाटी होती...
गाईड - कोणती?
पर्यटक - 'हा-हा-ही हास्यक्लब'.... !

Tuesday, November 18, 2008

जोड्या लावा....

शिक्षकांच्या खोलीत गणिताचे शिक्षक विज्ञानाच्या शिक्षकांना म्हणाले, ''गणितात मी एवढा हुशार, पण पगाराचं उत्पन्न आणि घरखर्च यांचं समीकरण काही केल्या जमत नाही.''
त्यावर विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, ''घरखर्चाच्या गणिताचं काय घेऊन बसलात सर, अहो 'जोड्या लावा' या प्रश्नात माझा हातखंडा, पण माझ्या आयुष्यात मात्र मला स्वतःची योग्य जोडी नाही लावता आली हो...''

Sunday, November 16, 2008

हलके हलके

प्रियकर - एकमेकांच्या सहवासात किती हलके हलके वाटते ना!
प्रेयसी - हो ना रे राज्जा! अगदी गॅसच्या फुग्यांप्रमाणे....
प्रियकर - असं वाटतं, की असंच प्रेमाच्या आकाशात वर वर जाऊन स्वर्गसुखाचा आस्वाद घ्यावा.
प्रेयसी - हो ना!... पण लग्न झाल्यानंतर हा प्रेमाचा गॅस संपला तर...
प्रियकर - लग्न झाल्यानंतर तू फक्त स्वयंपाकाची चिंता कर, गॅसचं मी पाहून घेईन!

Saturday, November 15, 2008

काय करू?

प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

Friday, November 14, 2008

फारच छान!!

प्रेयसी - राजा, तुझ्या घरी काय काय आहे रे?
प्रियकर - सर्व काही आहे राणी!
प्रेयसी - म्हणजे नेमकं काय काय आहे?
प्रियकर - अगं फोर व्हिलर, टू व्हिलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन...
प्रेयसी - अजून?
प्रियकर - होम थिएटर, ओव्हन, कुलर...
प्रेयसी - आणखी काही?
प्रियकर - फूड प्रोसेसर, गॅस गिझर...
प्रेयसी - छान! पण तुझ्या घरी कोण कोण असतं रे?
प्रियकर - मला कुणीच नाही. आई होती, तीही सहा महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली. पण तिची आठवण म्हणून तिचे दागिने मी कपाटात जपून ठेवले आहेत.
प्रेयसी - वा! फारच छान!!

Thursday, November 13, 2008

काय करशील?

प्रियकर - राणी, लग्न झाल्यावर तू माझ्यासाठी काय काय करशील गं?
प्रेयसी - राजा, सारं सारं करील रे!
प्रियकर - म्हणजे नेमकं काय काय करशील?
प्रेयसी - समजा, दिवसभर काम करून तुझे हातपाय दुखले, तर मी ते चेपून देईल!
प्रियकर - डोकं दुखलं तर...
प्रेयसी - दाबून देईल!
प्रियकर - पण समजा, दिवसभर तुझ्याशी भांडून भांडून माझा घसा दुखला तर....?
प्रेयसी - तर मी तुझा गळा दाबीन!!!