Sunday, July 25, 2021

नंदनवन

नंदनवन बंगल्याच्या गेटवर मोठ्या अक्षरात पाटी होती-

 ‘गेटसमोरील जागा मूर्खांच्या वाहनांसाठी राखीव आहे. शहाण्यांनी तेथे वाहन लावू नये, चाकातील हवा सोडण्यात येईल.’

 घाईघाईत मध्याने नेमकी तेथेच दुचाकी लावली. काम आटोपून आल्यावर पाहतो तर काय, दोन्ही चाकात हवा नव्हती. रागातच त्याने बॅगेतून मार्कर पेन काढला आणि बंगल्याच्या संगमरवरी पाटीवर ‘नंदनवन’च्या वर ठळक अक्षरात लिहिले- ‘मूर्खांचे’!

Thursday, December 26, 2013

प्रेम कुणावरही करू नये!

आपण आपलं मस्तीत जगावं
हॉटेलात जावं.. खावं - प्यावं...
पोरींचं बिल उगाच भरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!
प्रेम म्हणजे
एक अजब गेम असते
जिच्यासाठी आपण धडपडतो
...तडफडतो
ती चक्क
दुसऱ्याची डेम असते
सत्य ध्यानी आल्यावर
फुक्कटचं झुरू नये;
प्रेम कुणावर करू नये!
म्हणे-
प्रेम म्हणजे
एक पवित्र नातं असतं!
अहो, कसचं काय!
प्रेम म्हणजे
एक विचित्र जातं असतं...
दळणारं आंधळं
दळदळ दळत असतं
आणि पीठ मात्र
भलतचं कुत्र खात असतं
आपण दळलेल्या पिठावर
ऐऱ्यागैऱ्याने चरू नये;
म्हणून आपणच
प्रेम कुणावर करू नये!
चेहऱ्यावरचं चांदणं तिच्या
कितीही दुधाळ असलं,
गुलुगुलू बोलणं तिचं
कितीही मधाळ असलं,
तरी...
शहाण्यानं मधमाशी
हातात धरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!

Tuesday, January 29, 2013

शिरस्ता...


व्यवस्थापक - आज आमच्या जलतरण तलावाचा प्रथम वर्धापनदिन... आणि या तलावाचे उद्घाटक मंत्रिमहोदय यांचा प्रथम स्मृतिदिन....
पत्रकार - म्हणजे?
व्यवस्थापक - अहो, मंत्रिमहोदयांचा शिरस्ताच तसा होता. केशकर्तनालयाचे उद्घाटन त्यांनी स्वतःचे केस कापून केले, तर भोजनालयाचे भोजन करूनच!
पत्रकार - मग इथे काय केले?
व्यवस्थापक - उद्घाटन समारंभाला आल्या आल्या त्यांनी जलतरण तलावात छान सूर मारला आणि....
पत्रकार - आणि काय?
व्यवस्थापक - त्यांना पोहता कुठे येत होतं...!

Sunday, March 14, 2010

खुशी आणि गम

लग्न लागल्या दिवशीच पीटर बारमध्ये दिसला, तेव्हा वेटरने आश्चर्याने विचारले,
''अहो साहेब, दुपारीच तुमचे लग्न लागले आणि संध्याकाळी तुम्ही इथे!''
''अरे यार आज मै बहुत खुश हूँ... आज माझी सुहाग रात...''
दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पुन्हा बारमध्ये दिसला, तेव्हा -
''साहेब, काल तुमची सुहाग रात... आणि आज सकाळीच तुम्ही इथे!''
''काय करणार, सुहाग रात्रीलाच आमची तर्रर्र अवस्था पाहून बायको उडाली भुर्रर्र... त्याच गममध्ये आलोय!''

Sunday, March 7, 2010

सेलिब्रेशन..

काय मग, आज तुमच्या लग्नाचा विसावा वाढदिवस...
हो!
मग काही विशेष सेलिब्रेशन?
केलं ना!
काय?
कचकचून भांडलो...
आँ?
एकमेकांची उणीदुणी काढली!
आणि?
दिवसभर अबोला धरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या...!

Thursday, December 31, 2009

अर्धा प्याला भरलेला!

नैराश्याने खूपच ग्रासल्याने मध्या एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला.

''डॉक्टर, मला खूप निराश वाटतंय, जगण्यात काही अर्थच नाही अशी माझी भावना झालेली आहे.''

''हे बघ, एवढा निराश होऊ नकोस. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहा.''

''पण ते कसं पाहायचं?''

''मला एक सांग, की तुला अर्धा भरलेला काचेचा ग्लास कसा दिसतो?''

''डॉक्टर, त्यात जर पाणी असेल, तर तो ग्लास मला अर्धा रिकामा वाटतो आणि जर त्यात दारू असेल तर तो मला भरलेला वाटतो....''

Wednesday, February 4, 2009

ती

राजू - तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही.
संजू - काय सांगतोस!
राजू - आणि ती प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही...
संजू - म्हणजे?
राजू - कारण, ती माझ्या स्वप्नातली परी आहे.
संजू - छान!
राजू - जगातल्या निर्दय तरुणींपेक्षा नक्कीच बरी आहे...